रविवार, १ ऑक्टोबर, २०१७

शक्यता (अशीही आणि तशीही ) भाग ४

                 मला शेवटची वार्निंग मिळाली.  "तुम्ही स्व मर्जीनी  आम्हाला माहिती देणार आहात डॉक्टर राहुल कि....?" माझा ठाम नकार! सरिताची सुटण्याची धडपड चालु असतानाच तिला गोळी घातली जाते. मी अवाक्…मग माझी सुटण्याची धडपड…माला दोन लोक मागून पकडतात! मला एक इंजेक्शन दिलं जातं.  मी गुंगीत जातो आणि त्या माणसांतला एक म्होरक्या मला प्रश्न  विचारु लागतो.  औषधाच्या गुंगीत मी त्या प्रश्नांनां उत्तरेही देऊ लागतो.  एखाद्या इंग्रजी सिनेमात शोभणारा तो प्रसंग प्रत्यक्षं माझ्या बाबतीत माझ्या डोळ्यांसमोर घडत असतो.  पण खरं तर त्या मला विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांत अणि त्यांच्या उत्तरांत रस होता। ती  प्रश्नोत्तरं जीवाचं  मोल देऊनही ऐकायला मला आवडलं असतं। पण सरिताच्या म्हणजे, माझ्याबरोबर असलेल्या जीवंत सरिताच्या मते ते योग्य नव्हतं! त्यामुळे तिनं  झटक्यात तिच्या  जवळच्या बॉक्सची  बटणे  दाबली.  प्रचंड वेगात  भिरभिरत  आम्ही  परत आमच्या  लॅब  मध्ये  येऊन  पोचलो .
                     तीनदा प्रचंड वेगात भिरभिरल्यामुळे असेल , किंवा त्या गुंगीच्या औषधाचा 'चुकून ' झालेला  परिणाम म्हणून असेल ..... किंवा  डोक्याला   अतिश्रम झाल्याने असेल , पण माझ्या डोळ्यांवर झापड आली . जाग आली तेंव्हा सरिता मला  हलवून जागे करीत होती . म्हणजे बहुतेक मी झोपलो होतो . हे सारं माझे  स्वप्नचं होते तर .... हायसं  वाटून मी सरिताला विचारलं ," तू कधी आलीस? मी किती वेळ झोपलो होतो कोण जाणे !"
  "मी इथे आल्याला आता २ दिवस ५ तास लोटलेत राहुल आणि तू झोपला नव्हतास. तू आणि मी बरोबरच इथे आलोय . "
" म्हणजे मी आत्ता जे पहिले ते स्वप्नं नव्हते ? ते खरे होते?"
"हो , खरं म्हणजे .... एक शक्यता .... म्हणजे .... "   आयुष्यात पहिल्यांदाच मी सरिताला  इतके गोंधळलेले पाहत होतो. त्यामुळे त्यातच मी इतका गुंग झालो की खोलीत ती व मी सोडून अजूनही कोणी व्यक्ती आहे हे माझ्या लक्षातच आले नाही .
                   " तुझ्या या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे आहे . आत्ता तू जो अनुभव घेतलास तो खराही आहे आणि खोटाही !" ती व्यक्ती बोलली .  हे काय उत्तर झाले? मी जरा  रागावूनच त्या व्यक्तीकडे पाहिलं आणि ... मला हसूच आवरेना . ती व्यक्ती सरिताच होती पण ' बुढ्ढी सरिता ' . ५५/ ६० वर्षांची ' बुढ्ढी ' सरिता !
                      तरुण सरिताने मला एक जोरदार चिमटा काढला आणि माझं हसणं कळवळण्यात बदललं .  पण बुढ्ढी सरिता मात्र हसतच होती. " होय मी सरिताच आहे. तुमच्या म्हणजे आपल्या प्रयोगातून ३० वर्षे पुढून आलेली सरिता. माझ्याकडे वेळ फार कमी आहे म्हणून मी तुम्हाला  एव्हढंच सांगेन की तू आणि सरिताने जे काही पहिले त्या शक्यता आहेत.  अश्या विविध शक्यता ज्या तुमचा प्रयोग यशस्वी झाला कि होऊ शकतात अश्या विविध शक्यता . ती दहा समांतर विश्वे आहेत जी दहा मितीत  अस्तित्वात आहेत. यातली एक शक्यता तुम्ही अनुभवणार आहात आणि  त्यावर बाकीच्या शक्यता बदलणार आहेत. आपल्या प्रयोगामुळं कदाचित यातली कुठली शक्यता आपण अनुभवायची  त्याची निवड  आपल्याला करता येईल . म्हणूनच मी आणि राहुलने म्हणजे ३०  वर्षांपुढच्या एका शक्यतेतील मी आणि राहुलने ठरवलं की ही  निवड करायचा अधिकार तुम्हाला द्यायचा . "